प्रस्तावना
॥ श्री॥
'आम्ही वैकुंठवासी । आलो याचि कारणासी । बोलिले जे ॠषी । साच भावे वर्ताया' ॥1॥
तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे कार्य करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अनेक संत सत्पुरुष होऊन गेले. या भूमीला संत, सद्गुरुंची फार मोठी परंपरा लाभली आहे. संत ज्ञानेश्वरापासून संत तुकाराम महाराजांपर्यंत, तसेच संत गजानन, संत साईबाबा, समर्थ रामदास, संत गोंदवलेकर महाराज अशा थोर संतानी निरनिराळया पध्दतीने उपासना सांगुन भक्तांची, साधकांची, शिष्यांची प्रगती करवून घेतली. त्यात कोणी भागवत धर्मी, कोणी रामदासी कोणी दत्तमार्गी असे संत, सद्गुरु होतं.
उपासना हा मुख्य उपदेश, उपासना हे मुख्य साधन प्रत्येकाने आपल्या आचरणातून जगासमोर ठेवले.
कारण -- उपासनेचा मोठा आश्रयो । उपासनेवीण निराश्रयो ॥ उदंड केले तरी तो जयो । प्राप्त नाही ॥' - समर्थ रामदास.
उपासनेशिवाय सर्व कांही व्यर्थ आहे हा ठाम विश्वास त्यांना असल्यामुळे प्रत्येक साधकाला, शिष्याला, भक्ताला उपासनेला लावणे, त्याचेकडून उपासना करवून घेणे, त्याकरिता आदर्श उपासकाचे प्रत्यक्ष जीवन जगून दाखविण्याचा अखंड खटाटोप संत, सद्गुरुंनी केला.
अशाच प्रकारच्या संत सद्गुरुंच्या मालीकेत 'सद्गुरु श्री विष्णुदास महाराज' ही विभूती महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यात तेल्हारा हया गांवी होऊन गेली. त्यांचा जन्म सावंतवाडीजवळ साखळी हया गावी 16 फेबु्रवारी1901 मध्ये झाला. बालपणापासून वयाच्या 52 वर्षापर्यंत भारतभर भ्रमण व उपासना (श्री गुरूचरित्र) करुन व त्यासोबत तीर्थक्षेत्र व सामाजिक परिस्थितीचा बारकाईने अभ्यास केला. आदर्श उपासक कसा असावा हयाचे चित्र हृदयात ठसवून घेतले व उपासनेची अखंड कास धरली. श्रीदत्तगुरूंनी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. 1952 साली वऱ्हाडामध्ये भांबेरी या गांवी (अकोला जिल्हा) सर्व प्रथम आले. भांबेरी, गाडेगांव व दत्तवाडी- तेल्हारा हे त्यांचे कार्यक्षेत्र असून 38 वर्षे अविरत ईश्वरी कार्य त्यांनी केले. हया कालावधीत हजारो लोकांना परमार्थाच्या; उपासनेच्या मार्गावर लावले. ईश्वरी शक्तीने अनेक चमत्कार त्यांचे जीवनात घडून आले. अनेक शिष्यांना, भक्तांना त्यांच्यामधील ईश्वरी शक्तीचे प्रत्यय आले. सद्गुरु श्री विष्णुदास महाराज हे दत्तोपासक असून श्री गुरूचरित्र हा त्यांचा मुख्य उपासना ग्रंथ होय. त्यानुसार शुध्द आचार विचारांना त्यांनी विशेष महत्व दिले. 'शुध्द आचार विचार व उपासना हयाशिवाय सर्वांगीण विकास व परमार्थ अशक्य आहे', असे ते ठामपणे सांगत असत. परमार्थ व व्यवहार हयांची अप्रतिम सांगड त्यांचे जीवनात दिसून येते. त्यांनी उपासकासाठी उत्सव व उपासना हयांचा उपक्रम श्रीदत्तवाडी येथे सुरू केला. श्री दत्तजयंती, श्री नरसिंह सरस्वती जयंती, श्री राम नवमी, श्री गणेश उत्सव, श्री गुरूचरित्र, श्री गजानन विजयग्रंथ अखंड पारायण, अखंड प्रदक्षिणा कार्यक्रम, पालखी असे उत्सव व उपासनाक्रम सुरू केले. उत्सवांमध्ये कीर्तने, प्रवचने नियमित सुरू केले. श्री दत्तजयंतीचे दिवशी प.पू. महाराजांचे कीर्तन म्हणजे भक्तांकरिता एक पर्वणीच असे; त्यांना गाण्याचे उत्तम अंग होते. त्यांचा आवाज गोड व पहाडी असे.
1) 'आम्ही वैकुंठवासी । आलो याचि कारणासी । बोलिले जे ॠषी । साच भावे वर्ताया ॥'
2) बार बार नहि आवे अवसर । ही दोन पदे प्रत्येक कीर्तनात हमखास असत.
' दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ हे त्याचे आवडते नित्य भजन होय.
अशी ही महान विभूती 8 जून 1990 शुक्रवार रोजी समाधिस्थ झाली.
समाधीनंतरही त्यांची शक्ती श्री दत्तवाडी येथे व भक्तांकरिता सर्वत्र कार्यरत आहे. हयाचा प्रत्यय अनेक भक्तांना आला.
श्री मनोहरराव देव हयांचेकडे श्री दत्तवाडी येथील कार्याची जबाबदारी सोपविली व अल्पावधीतच त्या समाधीस्थळी भव्य मंदीर व मूर्तिस्थापना करवून घेतली (1993-माघ वद्य12 ला) यथाविधी मूर्ती स्थापना कार्य दि.14 ते 18 फेब्रुवारी 1993 रोजी संपन्न झाले.
प्रस्तुत 'सद्गुरू श्री विष्णुदास महाराज माहात्म्य' हयाची रचना पूर्णपणे प्रेरणेतून झाली असून त्यांत त्यांच्या जीवनातील चमत्कार व भक्तांना आलेले अनुभव वर्णन केलेले आहेत, त्याच सोबत त्यांनी उपदेशिलेले तत्त्वज्ञान प्रेरणेने आलेले आहे. ते साधकास प्रेरणा देणारे ठरतील असे वाटते. कोणत्या अध्यायात कोणती कथा असावी, कोणते तत्त्वज्ञान असावे, हयाची वेळोवेळी प्रेरणा मिळाली, त्यानुसार लिखाण (अनुभूतीजन्य) मजकडून करवून घेतले. त्यामुळे हे माहात्म्य (चरित्र) प्रेरणेनेच तयार झालेले आहे. त्यात माझे स्वत:चे काहीही नाही; चुका मात्र माझ्या आहेत, त्यास क्षमा करावी. या ग्रंथाचे चित्रांसाठी पुण्याचे श्री मुकुंद वामन आवदे हयांना प्रेरणा देऊन चित्र काढल्या गेले.
प.पू. महाराजांनी, सांगितल्याप्रमाणे गजानन आवदे हयांस स्वप्न प्रेरणा देऊन लिखाणानंतरचे कार्य पूर्ण करवून घेतले.
आपला
बा. गो. आवदे, ''गोविंदधाम'' चैतन्य कॉलनी, गोरक्षण रोड, अकोला
|